'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

चिंतन

माणसं + माणसं = माणसं

माणसं जोडणं म्हणजे काय ?
माणसं जोडणं म्हणजे,
समोरच्याला "आहे" तसा स्वीकारणं.
आपल्या अपेक्षा, आपली मतं न लादणं...

माणसं जोडणं म्हणजे,
ऐकण्याची कला शिकणं. 
फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं...

माणसं जोडणं म्हणजे,
माणसांवर "शिक्के" न मारणं.
समोरचा अधिक महत्त्वाचा - 
हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं...

माणसं जोडणं म्हणजे, 
कौतुकाची एकही संधी न सोडणं. 
तक्रार मात्र जपून करणं...

माणसं जोडणं म्हणजे, 
प्रतिक्रिया नव्हे, "प्रतिसाद" देणं.
रागाचंही रुपांतर प्रेमात करता येणं...

माणसं जोडणं म्हणजे,
इतरांना माफ करता करता स्वतःच मन साफ करणं...

आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे,
माणसं जोडणं म्हणजे,
इतरांचं मन जपणं..!!!    


एक सांगू !! बहिरे व्हा, यशस्वी व्हा!…

            दोन बेडूक होते, खेळता खेळता दोघेही एका कोरड्या विहिरीत पडले. ती विहीर बर्‍यापैकी खोल होती. दोघेही वर येण्याचे खूप प्रयत्न करु लागले.
           बघता बघता इतर सार्‍या बेडकांचा गोतावळा विहिरीच्या काठावर गोळा झाला. विहिरीतले बेडूक थोडं वर चढायचे, आणि लगेच खाली पडायचे, त्यांना जागोजागी खरचटायला लागलं.
            वरुन त्यांच्या शुभचिंतकांनी त्यांना सल्ले देण्यास सुरुवात केली. कशाला धडपड करताय? ह्या विहिरीतून तुम्ही कधीही वर येऊ शकणार नाही. आता आहात तसेच रहा. एवढं अंतर चढून वर येणं, तुम्हाला कधीही शक्य होणार नाही. तेव्हा रक्तबंबाळ होण्यात काहीच अर्थ नाही, बाहेर येण्यास धडपडू नका.
                    दोघांपैकी एका बेडकाने तो सल्ला ऐकला, आणि तळाशी जाऊन तो स्वस्थ बसला. त्यालाही वाटलं की आता इथून बाहेर पडणं अशक्य आहे.

दुसऱ्या बेडकाने मात्र प्रयत्न करणं चालू ठेवलं, तो उड्या मारत राहिला, वरुन जसजसा गोंगाट वाढला, तसतसे त्याचे प्रयत्नही वाढत राहिले.
               त्याचा हुरुप वाढत राहिला, आणि बघता बघता तो काठावर पोहचला सुद्धा. आता सर्व बेड्कांना त्याच्या धैर्याचं खूप खूप आश्चर्य वाटलं.

त्यांनी विचारलं, आम्ही नको नको म्हणत असताना तू वर कसा काय चढू शकलास? तेव्हा त्यांना कळालं की तो चक्क बहिरा होता. त्याला काहीच ऐकू येत नव्हतं.
          
उलट त्याला वाटत होतं, की हे सर्व त्याला ओरडून ओरडून प्रोत्साहन देत आहेत. आणि म्हणूनच तो वर चढण्याचं धाडस करु शकला होता.

आपल्याही आयुष्यात कधी कधी असं बहिरं होणं आवश्यक असतं. इतिहासात डोकावून पाहिलं तर हेच दिसेल, की अकल्पनीयरीत्या विलक्षण यशस्वी झालेले लोक बहिरे होते किंवा आजुबाजूला नकारात्मक गोंगाट करणार्‍या गोष्टींसमोर त्यांनी ठार बहिरे असल्याचं सोंग घेतलं होतं.

अमेरिकेत नॉर्थ केरोलिना शहरात राहणार्‍या, एका गरीब कुटुंबात दोन भाऊ राहत होते. लहानपणापासूनच त्यांना कुतुहल होते, जर हवेत पतंग उडू शकतो, पक्षी हवेत उडू शकतात, तर हवेत तरंगणारं एखादं यंत्र तयार करुन, त्यात बसून, माणूस हवेत का उडू शकणार नाही?
                 ह्या कल्पनेने ते भारावले होते. ओरोविल आणि विल्बर राईट ही त्यांची नावे. त्यांचं एक गॅरेज होतं, वर्षातून सहा महीने त्यात ते सायकली रिपेअर करायचे, पंचर काढायची, पैसे जमवायचे आणि उरलेले सहा महीने हवेत उडणार्‍या ग्लायडरचे प्रयोग करण्यात वेळ आणि पैसे खर्च करायचे.

सगळं जग त्यांच्यावर हसायचं. दोघांपैकी एकाकडेही साधा डिप्लोमा देखील नव्हता, हे दोघे सायंटिस्ट असल्याच्या अविर्भावात वावरतात म्हणुन लोक त्यांच्या प्रयोगांवर, त्यांच्या उड्डाणांवर फिदीफिदी हसत.
          त्यांची टिंगल करीत, लोकांच्या उपहासासमोर आणि टीकेसमोर राईट बंधु बहिरे झाले, आणि त्यांनी काम सुरुच ठेवलं. थोडीथोडकी नव्हे, तब्बल सोळा वर्ष अविरत प्रयोग केले, अनेक आकृत्या काढल्या, अनेक सूत्रं मांडली आणि एके दिवशी नियती त्यांच्यासमोर झुकली आणि विमान हवेत उडाले. राईट बंधू इतिहासात अमर झाले.

राजीव भाटीया उर्फ अक्षय कुमार हा आजच्या काळातला सुपरहीट हिरो. नव्वदीच्या दशकामध्ये त्याचा बॅड पॅच चालू होता. त्या दोन-तीन वर्षातले त्याचे बहुतांश चित्रपट लागोपाठ फ्लॉप होत होते.
                      
तेव्हा एका पत्रकाराने त्याला कुत्सितपणे विचारलं, तुझे ओळीने तेरा चित्रपट फ्लॉप झालेत, याबद्दल काय सांगशील? अक्षय हसून म्हणाला, तु सांगतोयस ते खरे नाही, माझे तेरा नाही तर सोळा पिक्चर ओळीने फ्लॉप झाले आहेत.
                 पण त्यामधून मी शिकेन आणि अजून जोमाने काम करेन, जगाने केलेल्या टिकेसमोर अक्षयकुमार बहिरा झाला आणि म्हणून पंचवीस वर्षापूर्वी पाच हजार रुपयांवर काम करणारा माणूस आज फक्त नऊशे त्र्याहत्तर करोड रुपयांचा मालक आहे.

ब्रायन एक्टन नावाचा माणूस जेव्हा फेसबुक कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला गेला तेव्हा नौकरी करण्यास तो योग्य नाही असं सांगून त्याला नाकारलं गेलं.
             इतकचं काय ट्विटर कंपनीमध्येही त्याला काम मिळालं नाही, जगाच्या नकारासमोर, निराश न होता, त्यानंही बहिर्‍याचं सोंग घेतलं, आणि आपल्या काही मित्रांना घेऊन वॉटसऍप कंपनी सुरु केली.
               तीच वाट्स अप, फेसबुकने एकवीस बिलीयन डॉलर्स म्हणजे तब्बल एक लाख एकोणचाळीस हजार करोड रुपयांना विकत घेतली. अपयशासमोर बहिरा झाल्याचा ब्रायन एक्टनला असा फायदा झाला.

स्टीव्ह जॉब्जला, त्याच्या उद्धट वर्तनाबद्दल, त्यानेच बनवलेल्या एप्पल कंपनीतून अपमानित करुन, काढून टाकलं गेलं. सिलीकॉन व्हॅलीत, जिकडे तिकडे त्याच्या अपयशाच्या चर्चा होत्या.
          इतकं की त्याचं बाहेर पडणं, लोकांत मिसळणंही अवघड झालं होतं. स्टीव्ह जॉब्ज बहिरा झाला. त्यानं नेक्स्ट आणि पिक्सार अशा दोन कंपन्या काढल्या, स्वतःच्या चुका सुधारल्या, नेक्स्टला एप्पलने खरेदी केलं आणि जगाला आयफोन, आयपॅड मिळाले. स्टीव्ह जॉब्ज इतिहासात अजरामर झाला.
          
थॉमस अल्वा एडीसन लहान असताना त्याच्या शिक्षकांनी त्याला मंदबुद्धी ठरवून, त्याचं नाव शाळेतून काढुन टाकलं होतं. त्याच्या आईने, शिक्षकांच्या सांगण्यापुढे, बहिरं व्हायचं ठरवलं.
              तिने एडीसनला प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले. ह्याच एडीसनने पुढे चमत्कार घडवले. त्याने शेकडो शोध लावले. विजेचा बल्ब हा त्याचा सर्वात क्रांतिकारी शोध.
              त्यासाठी त्याने दहा हजार प्रयोग केले. सगळं जग त्याला हे होवू शकणार नाही असं सांगत असताना, तो ठार बहिरा झाला. त्याने दुर्दम्य इच्छाशक्ती जागृत ठेवली आणि एके दिवशी यश मिळालेच बल्ब प्रकाशला. एडीसन जिंकला, पुन्हा एकदा जग हरलं.

साडेतीनशे वर्षापुर्वी जेव्हा सगळीकडे मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही राज्य करत होती, तेव्हा स्वराज्य स्थापन करणं शक्य आहे असं कोणाला स्वप्नातही वाटत नव्ह्तं.
               सगळे शूरवीर सरदारही गुलामगिरी करण्याखेरीज पर्याय नाही असंच मानत होते, पण शिवाजी महाराजांनी ह्या परिस्थितीला आव्हान दिलं, आणि इतिहास घडवला.
                

आपल्याला रोखणारे जसे बाहेर काही आवाज असतात तसेच आपल्या आतमध्येही काही  शत्रू राहत असतात. हा आतला गोंगाटच जास्त धोकादायक असतो.
                   माणसाच्या मनात त्याला सतविणार्‍या चिंतापैकी सत्यान्नव टक्के चिंता ह्या फक्त कल्पनेतच रुंजी घालतात, त्या कधीच प्रत्यक्षात येत नाहीत. मनाने उत्पन्न केलेली भीति, आणि त्या भितीचा बागुलबुवा हाच आपला सर्वात मोठा शत्रु आहे.
        त्याला जिंकण्यासाठीही त्याच्यापुढे बहिरे असल्याचं सोंग घ्यावं लागतं. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की यशाचे सारे मार्ग सुकर होतात.
 म्हणूनच भगवान बुध्द सांगतात  तूच स्वतः, तुझा खरा मित्र आहेस आणि तूच स्वतः, तुझा शत्रू आहेस. ह्या आतल्या गोंगाटावर जे विजय मिळवतात, तेच खरे यशस्वी होतात, म्हणून मी म्हणतो, बहिरे व्हा !, यशस्वी व्हा !…

        ◆∆◆∆◆∆◆∆◆∆◆∆◆∆◆∆◆∆◆∆◆

लोखंडाच्या एका सळीची किंमत २५० रुपये.
त्यापासुन घोड्याचे नाल बनवले तर त्याचे मुल्य होते १००० रुपये.
त्यापासुन सुया बनविल्या तर त्याचे मुल्य होते १०,००० रुपये.
त्यापासुन घड्याळाच्या बॅलन्स स्प्रिंग्ज बनविल्या तर त्याचे मुल्य होते १,००,००० रुपये.

तुम्ही स्वतः काय आहात यावर तुमचे मुल्य ठरत नाही. तर तुम्ही स्वतःला काय बनवता यावर तुमचे मुल्य ठरते..
आपण आपल्याला किती मौल्यवान बनवायचं हे आपल्याच हातात आहे.!!!
  "आपण एक दाणा पेरला असता, 
  आणि निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ? 

धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं .

पण ईश्वरानं माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे. 

आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो, हजारो दाणे देतो.

अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत ? 

दुःख, राग, द्वेष पेरत असेल तर निसर्गाकडून शेकडो, हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच परत मिळेल..,

आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असाल तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून परत मिळणार यात काहीच शंका नाही!

          

             *"पेरणी चालू आहे.."*
          *काय पेरायच हे आपल*
             *आपणच ठरवायच*
 
           ***^^^***^^^***^^^***


♨️ _*श्रेय* घेण्याचा मोह माणसाला आवरता आवरत नाही, कारण दुसऱ्याचे यश आपल्याला निर्भेळ स्वीकारता येत नाही_. 
♨️ _*यश* अशी गोष्ट आहे की_
   जी माणसाला माणूस ठेवत नाही, 
👻स्वतःला मिळाले तर गर्व वाढतो आणि 
👹दुसऱ्याला मिळाले तर मत्सर वाढतो. त्यातही 
🤔 *दुसऱ्याचे यश स्वीकारणे खूप अवघड आहे* शक्यतो माणूस दुसऱ्याच्या यशाचेही श्रेय
🦿स्वतः घेण्याचा प्रयत्न करतो आणि 
🦿ते शक्य नसेल तर ज्याला ते यश मिळालेले आहे, त्याला ते देण्याचा मोठेपणा न दाखविता , ते 👣अनुकूल परस्थितीला 👣घराण्याला 👣त्याला सहाय्य करणाऱ्याला देण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. 
👎🏾ही मानसिकता खिलाडू वृत्तीचा 
    अभाव असल्याने निर्माण होते. 
🦾 *खिलाडू वृत्ती* स्वतः खेळाडू असल्याशिवाय निर्माण होत नाही आणि याचे नाटक करता येत नाही. 
🦿 *खेळाडू* आपली हार नम्रपणे स्वीकारतो आणि प्रतिस्पर्ध्याचा विजय मनापासून खिलाडू वृत्तीने स्वीकारतो. 
🦿 *खेळाडू* प्रतिस्पर्ध्याच्या कष्टाला आणि प्रयत्नाला त्याचे श्रेय देतो व पराभवाचे कारण स्वतःत शोधतो. 
_जीवनाच्या खेळाचेही समीकरण_
        _असेच असायला हवे_. 
*जीवनातील कोणताही पराभव आपल्याला खिलाडू वृत्तीने स्वीकारता आला पाहिजे आणि प्रतिस्पर्ध्याच्या विजयाचे मनापासून अभिनंदन करता आले पाहिजे*.मग बघा _आपले जीवन किती मोकळे/ढाकळे बनतेय ते_⁉️ 
🦂❌कोणती आढी नाही, 
🦂❌कोणतीही आतली गाठ नाही 
_ही खिलाडू वृत्तीची लक्षणे आहेत_. 
असा खेळाडू कोणत्याही अवस्थेत 🦾झुंजायला तयार असतो आणि 💃🏾कायम उत्साही असतो .

👻👺 ~आतल्या गाठीचा माणूस~👺👻 
🦂मनात सतत गाठीच मारत राहतो, 
🦂याला कधीही मोकळे होता येत नाही 
🦂आणि मोकळे राहता येत नाही. 
🦂हा कोणाचेही यश मनापासून स्वीकारत नाही आणि त्याचे श्रेयही त्याला देत नाही, 
🦂हा फक्त त्याच्यावर जळत राहतो. 
🦂आपल्या पराभवाचे कारण नेहमी 
    दुसऱ्यात शोधतो , म्हणून 
    हा कधीच सुधारत नाही .  

_जीवनात जय पराजय होणारच असतात, फक्त_ 
👺आतल्या गाठीचे होऊ नका कारण 
   ही आतली गाठ मनात मारलेली असते, 
  ती दुसऱ्याला दिसत नाही आणि 
🌚शरीराची राख झाली तरी सुटत नाही. 
😫 *आपल्याला दुसऱ्याचे यश झोंबायला लागले की मनात आतली गाठ बसली म्हणून समजावे* , 
             ही  शो ध ण्या सा ठी 
   डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही.
             
********✍️ *डॉ . आसबे ल.म.*✍️*******
         
   

आयुष्याचे *गणित* चुकले
असे कधीच म्हणू नये .
आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते,

चुकतो तो *चिन्हांचा* वापर...!

*बेरीज*
*वजाबाकी*,
*गुणाकार*,
*भागाकार*
ही चिन्हें योग्य पद्धतीने वापरली की
उत्तर मनासारखे येते.

आयुष्यात कुणाशी *बेरीज* करायची,
कुणाला केंव्हा *वजा* करायचे ,
कधी कुणाशी *गुणाकार* करायचा
आणि *भागाकार* करताना
स्वतः व्यतिरिक्त किती
लोकांना सोबत घ्यायचे हे
समजले कि *उत्तर* मना-जोगते येते..!

आणि मुख्य म्हणजे

जवळचे नातेवाईक,मित्र
आप्तेष्ट यांना *हातचा* समजू नये ,
त्यांना *कंसात* घ्यावे!(👨‍👨‍👦‍👦)

कंस सोडविण्याची हातोटी
असली कि *गणित*
कधीच चुकत नाही ........!! 😊

आपल्याला शाळेत *त्रिकोण*,
*चौकोन*,
*लघुकोन*,
*काटकोन*,
*विशालकोन*
इत्यादी सर्व शिकवतात..
पण जो आयुष्यभर उपयोगी पडतो
तो कधीच शिकवला जात नाही.

तो म्हणजे " *दृष्टीकोन*"

आयुष्याचे *calculation* खूप वेळा केले, पण 'सुख दुःखाचे' *accounts* कधी जमलेच नाही...
जेंव्हा *total* झाली तेंव्हा समजले..की ' *आठवण*' सोडून काहीच *balance* उरत नाही...

 ➕➖➗✖✔📊📈📉❌


🎯 खंत 🎯
◇ ◆ ◇ ◆ ◇ ◆ ◇ ◆

♦दुसऱ्यासाठी करतानासुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं...
अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो... झटतो. प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो... कोणताही स्वार्थ नसतांना...
मतप्रवाह तर दोन्ही बाजूंनी असतात. ज्याच्यासाठी करतो त्याला वाटतं केलं आमच्यासाठी, तर काय फरक पडतो... याचं कर्तव्यच आहे...

 ♦करणाऱ्याचा हेतू स्वच्छ असतो.. आपल्या प्रयत्नाने कुणाचं तरी भलं व्हावं, हा निर्मळ प्रयत्न असतो..
गैरसमज हा फार मोठा शत्रू असतो. तो या निर्मळ भावनेलाच धोका निर्माण करतो...

ज्याला समजून घ्यायचंय, तो समजूतदारपणे गोष्टी हाताळतो... ज्याला समजून उमजून घायचंच नाही, तो शब्दाचा किस पडतो... शब्दांनी घायाळ करतो...

 ♦नात्यांची खरी मेख तर इथेच आहे... माझं माझं करता करता आपण आपल्यांना दुखावतो... घालून पाडून बोलतो... परिणाम फक्त वाईटच होतात... संबंध दुरावले जातात... आपुलकीतला रस संपत जातो... उरते ती फक्त निराशा...

हल्ली तर नातं आर्थिकदृष्टीतच बांधलेली दिसतात... जणू पैसा म्हणजे सर्वस्व... अमक्याने अमक्या कार्यक्रमात आहेर दिला नाही म्हणून राग... रस्त्याने जाताना ओळखीचे बोलले नाही हा राग... एखाद्या प्रसंगांत मागे उभे राहिले नाही म्हणून राग...

  ♦निर्व्याज प्रेम... जिव्हाळा... काळजी.. कुटुंबातील प्रेम हे सगळंच विरळ होत चाललंय ...

एकमेकांना टाळ्या देत हास्याची कारंजी उडणं लुप्त होतंय...

खरं बघितलं तर किती दिवस आपण जगणार, याची काहीच शाश्वती नाही... सोबतीला काय घेऊन जाणार, हेही माहीत नाही..

 ♦जिव्हाळ्याची अगदी कमी माणसं असतात, जी आपली काळजी करतात.. जीव ओतून आपल्याला घडवतात.. वेळप्रसंगी आपल्याला भल्यासाठी रागावतात, पण परत माया करतात... त्यांचा विसर कधीच पडू देऊ नये..

कोणाला व्यक्त होता येतं तर कोणाला नाही.. हा समजूतदारपणा अंगी यायला हवा..

 ♦जगण्यासाठी दिवस फार कमी आहेत.. तक्रारी मात्र त्यानंतरही सुरूच असणार..

दुसऱ्याला दुःखी करून आपण सुखी व्हावं ही भावना किती बोचरी आहे...

आयुष्य फक्त धावण्याची स्पर्धा नाही...

मिळेल ते अनुभव... मिळेल ती उपेक्षा... मिळेल ते प्रेम... आदर.. मिळेल ती अनुभूती घ्यावी...

 ♦प्रवाहात मुक्त जगावं.. जीवनात सगळेच रंग हवेत... निराशेतही आशा आहेच की... त्या ऊर्जेची वाट बघायची..

कोणा वाचून कोणाचं अडत नसतंच खरं तर... पण आनंद मात्र घेता येत नाही, तो आपल्या माणसांशिवाय...

 ♦कौतुक करणारं..पाठीवर हात ठेवणार कुणीतरी हवंच ना....

आपल्या दुःखाच्या प्रसंगी डोळ्यांत अश्रू येणारी... आपलं यश डोळे भरून बघणारी माणसं, ही हवीतच अवतीभवती...

नाहीतर यश.. पैसा खूप मिळवला पण माणसंच नसतील प्रेम करणारी, तर त्या सारखा दरिद्री तोच...खरं ना..??...
🌷  🌷 🌷  🌷 🌷

अक्षय
कंठातून गाण्यात आणि
गाण्यातून अंतरंगात जे नेतात
ते सूर..... *अक्षय*

अनुभवातून वाक्यात आणि
वाक्यातून डोळ्यात जी चमकते
ती बुद्धी... *अक्षय*

वर्दीतून निश्चयात आणि
निश्चयातून सीमेवर उभे असते
ते धैर्य.... *अक्षय*

एकांतातून शांततेत आणि
शांततेतून आनंदात जो लाभतो
तो आत्मविश्वास... *अक्षय*

सुयशातून सातत्यात आणि
सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते
ती नम्रता... *अक्षय*

स्पर्शातून आधारात आणि
आधारातून अश्रुत जी ओघळते
ती माया.... *अक्षय*

हृदयातून गालावर आणि
गालावरून स्मितेत जे तरंगते
ते प्रेम... *अक्षय*

इच्छेतून हक्कात आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री... *अक्षय*

स्मृतितून कृतित आणि
कृतितून समाधानात जी दिसते
ती जाणीव.... *अक्षय*

मनातून ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण..... *अक्षय*

💐💐💐💐

No comments:

Post a Comment